मुंबई महापौर निवडणूक: भाजपचा मोठा विजय, रितू तावडे मुंबईच्या नव्या महापौर

    07-Feb-2026
Total Views |
 
Ritu Tawde
 Image Source:(Internet)
मुंबई :
महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे (Ritu Tawde) यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ही घोषणा करताच, “मुंबई महानगरपालिका कोणाची?” या प्रश्नाचं उत्तर अखेर स्पष्ट झालं आहे.
 
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात भाजपने बाजी मारली असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘उबाठा’ गट आणि महाविकास आघाडीला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. तब्बल ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, सत्तास्थापनेचा दावा करत आज मुंबईच्या नव्या महापौरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
 
विशेष म्हणजे, सलग दुसऱ्यांदा मुंबईला महिला महापौर मिळणार असून, महापालिकेवर महिलाराज पाहायला मिळणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
 
शिवसेना (शिंदे गट) उपमहापौरपदी-
महापौरपद भाजपकडे असलं तरी मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांना उपमहापौरपद देण्यात येणार आहे. पहिल्या सव्वा वर्षासाठी संजय घाडी यांची उपमहापौरपदासाठी निवड करण्यात आली असून, याबाबतची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे.
 
किशोरी पेडणेकर पुन्हा गटनेतेपदी-
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट)च्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. वॉर्ड क्रमांक १९९ मधून शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव करत त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर उबाठा गटाने त्यांची महापालिकेच्या गटनेतेपदी निवड केली आहे.
 
२२ नोव्हेंबर २०१९ ते ८ मार्च २०२२ या कालावधीत त्या मुंबईच्या ७७ व्या महापौर होत्या. आता नव्या सभागृहात त्या आक्रमक विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका बजावणार असल्याचं चित्र आहे.
 
मुंबई महापालिकेतील अंतिम पक्षीय बलाबल
यंदाच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारली असली तरी, सत्ता स्थिर ठेवण्यासाठी युतीचं गणित महत्त्वाचं ठरलं आहे.
भाजप – ८९
शिवसेना (ठाकरे गट) – ६५
शिवसेना (शिंदे गट) – २९
काँग्रेस – २४
एमआयएम – ८
मनसे – ६
राष्ट्रवादी (अजित पवार) – ३
समाजवादी पक्ष – २
राष्ट्रवादी (शरद पवार) – १
 
गेली २५ ते ३० वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. मात्र आता ही सत्ता भाजपकडे गेल्याने, मुंबईच्या विकासकामांची दिशा आणि प्राधान्यक्रम बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रखडलेले प्रकल्प, कोस्टल रोडचे पुढील टप्पे, मेट्रो प्रकल्प यांना गती मिळेल, असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याचा फायदा मुंबईच्या विकासासाठी होईल, असंही भाजपकडून सांगितलं जात आहे.