Image Source:(Internet)
नागपूर :
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. योजनेतील e-KYC प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून लाभ न मिळालेल्या पात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती देत e-KYC दुरुस्तीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
मंत्र्यांनी स्पष्ट केले की, काही लाभार्थ्यांनी e-KYC करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांच्या अर्जांवर प्रक्रिया अडली होती. अनेक पात्र महिलांनी e-KYC पूर्ण करूनही योजनेचा लाभ न मिळाल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सर्व पात्र लाडक्या बहिणींना न्याय मिळावा, यासाठी e-KYC माहिती दुरुस्त करण्याची संधी पुन्हा देण्यात आली आहे.
महिला व बालविकास विभागाने सांगितले की, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या e-KYC प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या आहेत, त्यांनी दिलेल्या मुदतीत ती दुरुस्त करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
e-KYC दुरुस्तीची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
लाडकी बहीण योजनेत e-KYC दुरुस्ती करण्यासाठी लाभार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- 👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर जा.
- 👉 होमपेजवर ‘ज्या लाभार्थ्यांकडून e-KYC मध्ये चुकीचे पर्याय निवडले गेले आहेत, त्यांच्यासाठी ही संधी’ या पर्यायावर क्लिक करा.
- 👉 त्यानंतर स्क्रीनवर काही प्रश्न विचारले जातील.
- 👉 सर्व प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक आणि अचूक द्या.
विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, चुकीची माहिती भरल्यास पुढील अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे e-KYC दुरुस्ती करताना महिलांनी विशेष दक्षता घ्यावी.
सरकारचा उद्देश एकही पात्र महिला योजनेपासून वंचित राहू नये, हाच आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी दिलेल्या मुदतीआधी e-KYC दुरुस्ती करून योजनेचा लाभ निश्चित करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.