- ३१ मार्चपर्यंत शरण न आल्यास कठोर कारवाईचा इशारा
Image Source:(Internet)
गडचिरोली:
महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील अबूजमाड जंगल परिसरात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत ७ जहाल नक्षलवाद्यांना ठार केले असून, गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात नक्षलवाद आता अखेरच्या टप्प्यात पोहोचल्याचे चित्र समोर आले आहे. या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर एकूण ७१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
३ फेब्रुवारीच्या रात्रीपासून सलग तीन दिवस सुरू असलेल्या या कारवाईत नक्षल संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाला जबरदस्त धक्का बसला आहे. ठार झालेल्यांमध्ये गडचिरोली विभागीय समितीचा प्रमुख, पश्चिम सब-झोनल ब्युरोचा प्रभारी तसेच कंपनी क्रमांक १० चा कमांडर प्रभाकर याच्यासह कमांडर, पीपीसीएम, एसीएम दर्जाचे नेते आणि दलम सदस्य यांचा समावेश आहे.
सर्व मृत नक्षलवाद्यांची ओळख गुप्तचर यंत्रणांनी निश्चित केली असून, जिल्ह्यात आता केवळ ७ नक्षलवादी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. उरलेल्या नक्षलवाद्यांना ३१ मार्चपर्यंत शरणागती देण्याची अंतिम संधी देण्यात आली असून, त्या कालावधीत आत्मसमर्पण न केल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिला.
शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या यशस्वी कारवाईची सविस्तर माहिती दिली. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाच्या मुळावर घाव बसला असून, शांतता आणि विकासाच्या दिशेने जिल्हा वेगाने पुढे जात असल्याचे चित्र दिसत आहे.