विरोधी पक्षाच्या प्रश्नांवर पंतप्रधान मौन; राज्यसभेतील भाषण तथ्यहीन;खरगे यांचे विधान

    06-Feb-2026
Total Views |
 
Mallikarjun Kharge
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रदीर्घ भाषणावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Kharge) यांनी तीव्र टीका केली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान पंतप्रधानांनी सुमारे ९७ मिनिटे भाषण केले; मात्र त्या भाषणात कोणतेही ठोस तथ्य नव्हते आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांना थेट उत्तर देण्यात आले नाही, असा आरोप खरगे यांनी केला.
 
माध्यमांशी बोलताना खरगे म्हणाले की, पंतप्रधानांनी मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी भूतकाळातील गोष्टींची पुनरावृत्ती केली. भाषणात विरोधकांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर नव्हते, तसेच तथ्यांचा अभाव स्पष्टपणे जाणवत होता. संसद लोकशाही मूल्यांनुसार चालवण्याची सरकारची इच्छा नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते; मात्र पंतप्रधानांनी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप खरगे यांनी केला. ‘मला शिवीगाळ केली जाते’ असे पंतप्रधान सांगतात; पण शिवीगाळ मोजली जाते का, असा सवाल करत त्यांनी टोला लगावला.
 
जनरल एम.एम. नरवणे यांच्या पुस्तकाच्या मुद्यावरूनही खरगे यांनी सरकारवर टीका केली. पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नसल्याचा दावा काही वरिष्ठ मंत्र्यांनी केला होता; प्रत्यक्षात ते आधीच उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सभागृहाची दिशाभूल करण्याचा हा प्रकार असून, याबाबत विशेषाधिकार हननाचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
पंतप्रधानांनी काँग्रेसवर शीख समुदायाचा अपमान केल्याचा आरोप केल्यावर प्रतिक्रिया देताना खरगे म्हणाले की, हा आरोप पूर्णतः निराधार आहे. काँग्रेसने शीख समाजातीलच नामवंत अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना दोनदा देशाचे पंतप्रधान केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.
 
सध्याचे सरकार शीख, दलित आणि आदिवासी समाजाच्या सन्मानाची भाषा करते; मात्र प्रत्यक्ष व्यवहारात त्यांना अपेक्षित तो सन्मान मिळत नसल्याचा आरोपही काँग्रेस अध्यक्षांनी केला.
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतील भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका करत, विरोधक सततच्या निवडणूक पराभवामुळे नैराश्यात असल्याचे म्हटले होते. विरोधकांचा द्वेष असूनही ते आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवू शकले नाहीत, असे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच विरोधकांकडून होणारे व्यत्यय राष्ट्रपतींसारख्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान असल्याचेही त्यांनी नमूद केले.