Image Source:(Internet)
अकोला :
मुंबईत चित्रपटसृष्टीला हादरवणाऱ्या रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या निवासस्थानावरील गोळीबार प्रकरणात आता विदर्भाशी संबंधित महत्त्वाचा धागा समोर आला आहे. या घटनेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचे कनेक्शन थेट अकोला जिल्ह्याशी जोडले जात असून, त्यामुळे तपास यंत्रणांची धावपळ वाढली आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर एक धमकीचा संदेश वेगाने पसरला. या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे नमूद केले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शुभम लोणकर हा अकोला तालुक्यातील एका गावातून असल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल पोस्टमध्ये रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार केल्याचा उल्लेख असून, “हा फक्त इशारा आहे, पुढचा हल्ला अधिक गंभीर असेल,” असा धमकीवजा मजकूर असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पोस्टमध्ये अर्शदुल बिश्नोई याचेही नाव घेण्यात आले आहे.
या घडामोडीनंतर मुंबईसह राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. विशेष म्हणजे शुभम लोणकर याला यापूर्वी पुण्यातील वाघोली भागातून अटक करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र आता या प्रकरणात जबाबदारी स्वीकारल्याचा दावा पुढे आल्याने अकोला जिल्हा पोलीस, राज्य पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा संयुक्तपणे सखोल चौकशी करत आहेत.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शुभम लोणकर याचे नाव याआधीही गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये समोर आले आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध आहेत का, याचीही तपासणी सुरू असून या प्रकरणातून आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानी कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणावर तपास यंत्रणांचे बारकाईने लक्ष आहे.