Image Source:(Internet)
बडोदा :
वुमन्स प्रीमिअर लीग 2026 (WPL 2026) च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने दिल्ली कॅपिटल्सवर थरारक विजय मिळवत दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. बडोद्याच्या कोटांबी स्टेडियमवर झालेल्या या ऐतिहासिक लढतीत कर्णधार स्मृती मानधना हिच्या नेतृत्वाखाली आरसीबीने नवा इतिहास रचला.
या विजयानंतर आरसीबी संघावर अक्षरशः कोटींचा वर्षाव झाला. विजेतेपदाच्या बक्षीस म्हणून संघाला तब्बल ६ कोटी रुपये मिळाले. वुमन्स प्रीमिअर लीग सुरू झाल्यापासून हीच बक्षीस रक्कम कायम ठेवण्यात आली आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सने दोन वेळा, तर आरसीबीने 2024 मध्ये एकदा ही स्पर्धा जिंकून ६ कोटींची कमाई केली होती. आता 2026 मध्ये पुन्हा एकदा आरसीबीने ही परंपरा कायम राखली आहे.
उपविजेते ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघालाही रिकाम्या हाताने परत जावे लागले नाही. स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप, सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप, तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात आले. याशिवाय सर्वाधिक षटकार मारणारी खेळाडू आणि सर्वोत्तम स्ट्राईक रेट असलेल्या खेळाडूलाही प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.
अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत २०३ धावांचा डोंगर उभारला आणि आरसीबीसमोर २०४ धावांचे आव्हान ठेवले. महिला प्रीमिअर लीगच्या इतिहासात इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग यापूर्वी कधीच झाला नव्हता. मात्र स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली आरसीबीने हे अशक्यप्राय आव्हान शक्य करून दाखवले.
आरसीबीने अवघ्या १९.४ षटकांत चार गडी गमावत २०४ धावा करत विजय साकारला. हा विजय केवळ अंतिम सामन्यातीलच नव्हे, तर संपूर्ण WPL इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी धावांच्या पाठलागांपैकी एक मानला जात आहे. या यशासह आरसीबीचा समावेश आता मुंबई इंडियन्ससोबत सर्वाधिक वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या संघांच्या यादीत झाला आहे.