Image Source:(Internet)
नागपूर :
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वानाडोंगरी परिसरातील ‘एमएच ४० इन’ या ओयो हॉटेलमध्ये (Oyo Hotel) सुरू असलेल्या देहव्यापाराच्या टोळीचा घरफोडी विरोधी पथकाने भंडाफोड केला आहे. या कारवाईत हॉटेलच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून राज्याबाहेरील तीन महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.
निखिल नीलकंठ सोनवणे (वय २७, रा. भीमनगर, चांदूर रेल्वे, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. तर हॉटेलचे मालक योगेश कैलास ठाकरे, हर्षल कैलास ठाकरे आणि त्यांचा भागीदार संतोष गणपत बिसेन हे तिघे आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलीस निरीक्षक दिलीप चंदन यांच्या नेतृत्वाखालील घरफोडी विरोधी पथकाला संगम रोडवरील डेंटल कॉलेजजवळ असलेल्या या हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (ता. ३) सायंकाळी सुमारे पावणेपाचच्या सुमारास सापळा रचून हॉटेलवर छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान व्यवस्थापक निखिल सोनवणे हा आर्थिक आमिष दाखवून महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ तीन महिलांची सुटका करत आरोपीला अटक केली. या कारवाईत दोन मोबाईल फोन, रोख रक्कम, एक कार, हॉटेल रजिस्टर असा एकूण ३ लाख ४१ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी दोन महिला पंजाबमधील लुधियाना येथील असून एक महिला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील आहे. व्यवस्थापक निखिल याने त्यांच्याशी संपर्क साधून ठराविक मोबदल्याचे आमिष दाखवत नागपुरात बोलावून घेतले होते. गेल्या काही महिन्यांत त्या महिलांची हॉटेलमध्ये वारंवार ये-जा असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.