Image Source:(Internet)
फिलिपिन्स:
फिलिपिन्समधील (Philippines) एका लहान बेटावर भीषण आग लागून मोठी हानी झाल्याची घटना समोर आली आहे. बारंगाय लामिओन या दाट लोकवस्तीच्या किनारी भागात मंगळवारी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास ही आग लागली.
प्रचंड वारे आणि घरांचे लाकूड व हलक्या साहित्याचे बांधकाम असल्याने आग झपाट्याने पसरली. अवघ्या काही तासांत सुमारे १ हजार घरे पूर्णपणे जळून खाक झाली.
हजारो नागरिक बेघर-
या आगीत ५ हजारांहून अधिक नागरिकांना घराबाहेर पडावे लागले. परिस्थिती गंभीर होताच प्रशासनाने जमिनीवरील मार्गांसह समुद्रमार्गाने बोटींच्या साहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.
सध्या बाधित कुटुंबांना दोन तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात आले असून, तेथे अन्न, पाणी आणि आवश्यक मदत पुरवली जात आहे.
जीवितहानी नाही; मात्र प्रचंड नुकसान
या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून, ही बाब दिलासादायक आहे. मात्र अनेक कुटुंबांचे कपडे, कागदपत्रे आणि दैनंदिन वापरातील साहित्य पूर्णपणे नष्ट झाले आहे.
मदतकार्य वेगात; कारणाचा शोध सुरू-
स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि कोस्ट गार्ड संयुक्तपणे मदतकार्य राबवत आहेत. बाधितांसाठी मदत साहित्य पाठवण्यात येत असून, वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. ही घटना परिसरातील अलिकडच्या काळातील सर्वात भीषण आगींपैकी एक मानली जात आहे.