Image Source:(Internet)
मुंबई :
बारामतीजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत प्राण गमावलेले अंगरक्षक विदीप जाधव (Videep Jadhav) यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक निर्णय समोर आला आहे. जाधव यांनी घेतलेला १ कोटी रुपयांचा अपघात विमा मंजूर करण्यात आला असून, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली आहे. दुर्घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच हा निर्णय झाल्याने कुटुंबीयांना थोडा आधार मिळाला आहे.
२८ जानेवारी रोजी घडलेल्या या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये विदीप जाधव, दोन वैमानिक आणि एका फ्लाईट अटेंडंटचा समावेश होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, विदीप जाधव यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून वैयक्तिक अपघात विमा घेतला होता. त्यांच्या निधनानंतर विमा कंपनीने तातडीची कार्यवाही करत दावा मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक भविष्यासाठी महत्त्वाचा आधार मिळणार आहे.
२००९ साली मुंबई पोलीस दलात दाखल झालेले विदीप जाधव हे कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जात होते. २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंगरक्षक पथकात कार्यरत होते.
कळवा-विटावा परिसरात वास्तव्यास असलेले जाधव हे आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह राहत होते. कामावर निघताना दिलेला आईचा निरोप हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा संवाद ठरला, ही बाब कुटुंबीयांसाठी वेदनादायक आहे.
मूळचे फलटण तालुक्यातील तरडवाडी येथील असलेल्या विदीप जाधव यांना वडिलांच्या उपचारांसाठी गावी जायचे होते. बारामतीपासून जवळ असल्याने त्यांनी त्या दिवशी अजित पवार यांच्या दौऱ्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र तो प्रवासच त्यांच्या आयुष्याचा अखेरचा टप्पा ठरला.
कर्तव्य बजावत असताना त्यांनी प्राण गमावले, अशी भावना सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. विम्याच्या स्वरूपात मिळालेला हा आर्थिक दिलासा दुःख कमी करू शकत नसला, तरी त्यांच्या कुटुंबासाठी तो भविष्यातील आधार ठरणार आहे.