Image Source:(Internet)
नागपूर:
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल जाणवत असून फेब्रुवारी महिन्यातच अवकाळी पावसाची (Rain) शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा जारी केला आहे. वाढती उष्णता आणि दमट वातावरणामुळे पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाल्याचं हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, अहिल्यानगर, नंदूरबार, जळगाव, धुळे आणि नाशिक या आठ जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेगही वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
राज्यात कधी थंडी तर कधी उकाडा असा संमिश्र हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. डिसेंबरमध्ये जाणवलेली थंडी जानेवारीनंतर कमी झाली असून १ जानेवारीच्या पावसानंतर तापमानात सातत्याने चढउतार होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात फारशी थंडी जाणवणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने आधीच वर्तवला होता.
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात किमान तापमान सुमारे १४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. सकाळी व रात्री हलकासा गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर कडक ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याचं चित्र आहे. पुढील दोन दिवस हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामानातील सतत बदलांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून सर्दी, ताप, अंगदुखीच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.