Image Source:(Internet)
बारामती :
महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्या सर्वात महत्त्वाची घडामोड बारामतीतून समोर येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीतील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी आज दाखल झाले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांची ही पहिलीच भेट ठरत आहे.
या भेटीआधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार हे देखील बारामतीत पोहोचले. रोहित पवार यांच्यासह त्यांचे आई-वडीलही उपस्थित असून, पवार कुटुंबातील अनेक सदस्य आज सहयोग सोसायटीत एकत्र आल्याचे चित्र आहे.
सहयोग सोसायटीतील निवासस्थानी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. शरद पवार दाखल होताच त्यांनी सर्वप्रथम अजित पवार यांच्या प्रतिमेला वंदन केले. यावेळी रोहित पवार हेही उपस्थित होते. अभिवादनानंतर शरद पवार आसनस्थ झाले, तर काही अंतरावर सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र जय पवार उपस्थित होते. परिसरात शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे.
आठव्या दिवशी शोकांतिकेची आठवण
अजित पवार यांच्या निधनानंतर आज आठवा दिवस असून, या घटनेने केवळ पवार कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वैयक्तिक दुःखातून सावरत राज्याची आणि जनसेवेची जबाबदारी सांभाळण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे.
राजकीय चर्चांकडे लक्ष
सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच शरद पवार आणि सुनेत्रा पवार समोरासमोर येत असल्याने, या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पार्थ पवार आणि जय पवार यांनी याआधी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे.