आजचं राजकारण किळसवाणं झालंय…रोहित पवारांची अस्वस्थ करणारी भावनिक पोस्ट

04 Feb 2026 17:09:23
 
Rohit Pawar
 Image Source:(Internet)
मुंबई:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणावर (Politics) शोककळा पसरलेली असतानाच, त्यांच्या जाण्यानंतर अवघ्या काही दिवसांत सुरू झालेल्या राजकीय घडामोडींमुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांच्या निधनाला अजून आठवडाही पूर्ण झालेला नसताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणापासून ते सत्ताकेंद्रातील हालचालींपर्यंत अनेक दावे-प्रतिदावे समोर येत आहेत.
 
28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर लँडिंगच्या काही मिनिटे आधी अजित पवार यांचे खासगी चार्टर्ड विमान कोसळले. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं.
 
या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात टीकेचा सूर उमटू लागला. शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केलेल्या विधानांनंतर या चर्चांना अधिकच धार चढली. 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण होणार होतं, असा दावा त्यांनी केला. तसेच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
या सगळ्या घडामोडींमुळे अजित पवार हयात असताना नेमक्या कोणत्या चर्चा झाल्या, कुणाशी संवाद झाला, कोणते निर्णय ठरले होते, यावर दिवसभर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होते.
 
याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आजच्या राजकारणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
 
“आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय… छक्के-पंजे करता येणं हाच जर राजकारणाचा निकष असेल, तर चांगल्या माणसाने खरंच राजकारणात राहावं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
 
अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवार मानसिकदृष्ट्या कोलमडल्याचं चित्र दिसत होतं. मात्र, त्यांनी स्वतःला सावरत कार्यकर्त्यांना धीर दिला आणि त्यांच्याशी संवाद साधत आधार देण्याची भूमिका घेतली. विशेष म्हणजे, विमान अपघातात अजित पवार यांच्यासोबत मृत्युमुखी पडलेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन रोहित पवार यांनी त्यांना धीर दिला.
 
एकीकडे शोक, तर दुसरीकडे सत्तेची गणितं या दोन्हींच्या मधोमध महाराष्ट्राचं राजकारण सध्या अस्वस्थ करणाऱ्या टप्प्यावर उभं असल्याचं चित्र रोहित पवारांच्या या पोस्टमधून स्पष्ट होत आहे.
Powered By Sangraha 9.0