सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ,पगारात थेट वाढ होणार!

04 Feb 2026 20:25:02
 
Dearness allowance
 Image Source:(Internet)
मुंबई :
महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) 2 टक्क्यांची वाढ निश्चित झाली आहे. या निर्णयाचा फायदा लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.
 
ही वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक (AICPI – IW) च्या आधारे ठरवण्यात आली असून, कामगार व रोजगार मंत्रालयाने नुकतीच डिसेंबर 2025 महिन्याची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जानेवारी 2026 पासून डी.ए. किती वाढणार, याबाबतची अनिश्चितता आता दूर झाली आहे.
 
AICPI च्या आधारे ठरते DA वाढ-
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी, म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात, AICPI च्या सरासरीवर निश्चित केला जातो. जानेवारी 2026 साठीची डी.ए. वाढ जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीतील निर्देशांकाच्या सरासरीवर आधारित आहे.
 
कामगार व रोजगार मंत्रालयाने 30 जानेवारी 2026 रोजी डिसेंबर 2025 चा AICPI निर्देशांक 148.2 असल्याचे जाहीर केले. या आकडेवारीच्या आधारे महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ निश्चित झाल्याची माहिती कर्मचारी संघटनांकडून देण्यात आली आहे.
 
थकबाकीसह (Arrears) लाभ मिळण्याची शक्यता-
ही डी.ए. वाढ जानेवारी 2026 पासून लागू होणार असल्याने कर्मचाऱ्यांना मागील महिन्यांची थकबाकी (arrears) देखील मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असून, होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून घोषणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पगारात किती वाढ होणार?
महागाई भत्त्यातील 2 टक्के वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात हजारो रुपयांची वाढ होणार असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
Powered By Sangraha 9.0