- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित
- या यात्रेत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या प्रमुख पवित्र नद्या आणि धार्मिक स्थळांवर अस्थी विसर्जित केल्या जाणार
Image Source:(Internet)
मुंबई:
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajitdada Pawar) यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने देशव्यापी कलश यात्रेचे आयोजन केले असून ही यात्रा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या देशातील प्रमुख पवित्र नद्या आणि धार्मिक स्थळांवर अस्थी विसर्जित केल्या जाणार आहेत. दरम्यान या अस्थी कलश यात्रेच्या माध्यमातून देशभरातील लाखो समर्थकांना अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी मिळणार आहे. मंगळवारी बारामती येथील निवासस्थानी विधिवत पूजा झाल्यानंतर पार्थ अजित पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे अस्थिकलश सुपूर्द केले.
आदरणीय अजितदादा हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते तर त्यांच्या विचारसरणीला आणि नेतृत्वाला संपूर्ण देशाने स्वीकारले होते. देशभरातील त्यांच्या असंख्य समर्थकांना व कार्यकर्त्यांना वेळेअभावी बारामती येथे अंतिम दर्शन घेता आले नव्हते. त्यामुळे दादांच्या अस्थीचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लोकं प्रतिक्षा करत आहेत. या अस्थी कलश यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आदरणीय अजितदादा यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करत असून त्यांच्या विचारांचा आणि मूल्यांचा प्रसार देशाच्या कानाकोपऱ्यात करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती पार्थ पवार यांनी यावेळी दिली.
या अस्थी कलश यात्रेची सुरुवात दिल्ली येथील मुख्यालयात पूजन करून करण्यात येणार असून, त्यानंतर हे अस्थीकलश संपूर्ण देशभर पाठवले जाणार आहे. ही अस्थी कलश यात्रा आजपासून ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. या कालावधीत अस्थी कलश यात्रा देशाच्या १० हून अधिक राज्यातून प्रवास करणार आहे. यात्रेची विधिवत सुरुवात देवभूमी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील हर की पौडी आणि उत्तरप्रदेशातील तीर्थराज प्रयागराज येथील पवित्र संगमापासून करण्यात येणार आहे. याशिवाय, वाराणसीतील मणिकर्णिका घाट, बिहारची राजधानी पटना, झारखंड, पंजाब, काश्मीर, कन्याकुमारी यासह अनेक राज्यामध्ये अस्थीचे विसर्जन आणि शोकसभा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कलश यात्रेत उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि तामिळनाडूसारख्या राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांवर अस्थी विसर्जन करण्यात येणार आहे. या माध्यमातून अजितदादांच्या विकासकार्यांचा, शेतकरी हिताच्या धोरणांचा आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचा प्रसार केला जाणार आहे. या अस्थी कलश यात्रेचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा करणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत.