SIR प्रकरणी सुप्रीम कोर्टात ममता बॅनर्जींची थेट भूमिका; ‘आम्हाला न्याय द्या’ अशी विनंती

    04-Feb-2026
Total Views |
 
Mamata Banerjee
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली:
पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (SIR) प्रक्रियेविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर मंगळवारी (4 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी ममता बॅनर्जी स्वतः न्यायालयात उपस्थित राहून त्यांनी आपली भूमिका मांडली.
 
सुनावणीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालला मुद्दाम लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप केला. मतदार याद्यांतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळली जात असून, निवडणुका तोंडावर असताना SIR प्रक्रिया घाईघाईने राबवली जात असल्याचं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.
 
“आम्हाला न्याय हवा आहे, म्हणूनच आम्ही सर्वोच्च न्यायालयात आलो आहोत,” अशी थेट विनंती त्यांनी केली.
 
ममता बॅनर्जी यांनी यावेळी निवडणूक आयोगावरही तीव्र टीका केली. निवडणूक आयोगाला ‘व्हॉट्सअॅप आयोग’ असे संबोधत, आयोगाकडून अनेक नागरिकांची नावे मतदार यादीतून काढून टाकली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याआधीही आपल्या आक्षेपांची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती, मात्र तिथे कोणीही ऐकून घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
 
या प्रकरणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून, आयोगाकडून उत्तर मागवण्यात आलं आहे. या याचिकेवर 9 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
 
आता निवडणूक आयोग या नोटीसीला नेमकं काय उत्तर देतो आणि SIR प्रक्रियेबाबत कोणती भूमिका मांडतो, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.