जालन्यात २५ कोटींचा अनुदान घोटाळा; २२ तलाठीसह ३१ जण अटकेत

    04-Feb-2026
Total Views |
 
Jalna
 Image Source:(Internet)
जालना :
जालनातील (Jalna) अतिवृष्टी अनुदान प्रकरणात तब्बल २५ कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ३१ आरोपींना अटक केली आहे. नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेल्या अनुदानावरच सरकारी बाबूंनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
 
अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, शासनाने जाहीर केलेले अनुदान प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याऐवजी, भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने बनावट नावे व खोट्या नोंदी करून कोट्यवधींचा अपहार केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ज्या व्यक्तींच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही, अशा व्यक्तींनाही लाभार्थी दाखवण्यात आले.
 
तहसीलदारांचे लॉगिन व पासवर्ड गैरवापरून संगणकीय प्रणालीमध्ये फेरफार करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. घोटाळा उघडकीस येऊ नये म्हणून कागदोपत्री तसेच डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
गुन्हा नोंद होताच आरोपींनी मोबाईल बंद करून भूमिगत होण्याचा प्रयत्न केला. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत ३१ आरोपींना अटक केली.
 
दरम्यान, आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, घोटाळ्याचे गांभीर्य आणि तपासातील ठोस पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने सर्व जामीन अर्ज फेटाळले.
 
या प्रकरणात आतापर्यंत ३५ जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यापैकी ३१ जण कोठडीत आहेत, तर ४ आरोपी फरार आहेत. घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी आरोपींची बँक खाती सील करण्यात आली असून, काहींच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात आला आहे. तपासासाठी मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
 
या प्रकरणात २२ तलाठी, ५ तहसील कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी तसेच संगणक ऑपरेटर आणि नेटवर्क इंजिनिअर्स यांचा समावेश आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली आहे.