पंतप्रधान मोदींची ‘एक झाड आईच्या नावाने’ मोहीम इस्रायलमध्ये; ३०० रोपांची केली लागवड !

03 Feb 2026 13:14:57
 
 PM Modi
 Image Source:(Internet)
नेवातिम (इस्रायल) :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांच्या ‘एक झाड आईच्या नावाने’ या उपक्रमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोच घेतली असून, इस्रायलमधील मोशाव नेवातिम येथे या मोहिमेअंतर्गत किमान ३०० झाडांची लागवड करण्यात आली. याच वेळी पर्यावरण जागृतीशी निगडित ज्यू सण ‘तू बिश्वात’ही उत्साहात साजरा करण्यात आला.
 
या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. इस्रायलमधील भारतीय दूतावासाच्या पुढाकाराने, इस्रायलची स्वयंसेवी संस्था ‘केरेन कायमेट लेइस्रायल’ आणि कृषी वसाहत मोशाव नेवातिम यांच्या सहकार्याने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत आणि इस्रायल यांच्यातील पर्यावरणीय शाश्वतता, सामुदायिक सहभाग आणि लोकांमधील दृढ संबंध यांची ही संयुक्त बांधिलकी दर्शवणारा कार्यक्रम असल्याचं दूतावासाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं.
 
या प्रसंगी इस्रायलच्या पर्यावरण संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक रामी रोजेन, इस्रायलमधील भारताचे राजदूत जे. पी. सिंह आणि बनेई शिमोन प्रादेशिक परिषदेचे प्रमुख निर झमीर उपस्थित होते. पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने भारत-इस्रायलची समान भूमिका असल्याचं या मान्यवरांनी अधोरेखित केलं.
 
राजदूत जे. पी. सिंह यांनी सांगितलं की, ‘तू बिश्वात’ आणि ‘एक झाड आईच्या नावाने’ या दोन्ही संकल्पनांमध्ये झाडांना सामुदायिक सहभाग आणि शाश्वत जीवनशैलीच्या केंद्रस्थानी स्थान देण्यात आलं आहे. या परंपरा भारत आणि इस्रायलमधील सांस्कृतिक नात्यांची खोली दाखवतात आणि दोन्ही देश निसर्ग, समाज व सामायिक मूल्यांना किती महत्त्व देतात, हे अधोरेखित करतात.
 
ते पुढे म्हणाले की, ही लागवड केलेली झाडे भारत-इस्रायल मैत्रीची चिरस्थायी प्रतीक ठरतील आणि हा संबंध पुढील पिढ्यांपर्यंत दृढ करतील.
 
मान्यवर पाहुण्यांनी भारत-इस्रायलमधील मजबूत धोरणात्मक भागीदारीचा उल्लेख करत, आजच्या आणि भावी पिढ्यांसाठी पृथ्वीमातेचं संरक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं नमूद केलं.
 
इस्रायलच्या पर्यावरण मंत्रालयाचे महासंचालक रामी रोजेन यांनी सांगितलं की, आजचा उपक्रम भारत आणि इस्रायलमधील
 घनिष्ठ संबंधांचं प्रतीक आहे. विशेषतः हवामान बदल आणि पर्यावरण क्षेत्रात दोन्ही देश परस्पर सहकार्य करत आहेत. नवकल्पनांची समान दृष्टी असतानाच निसर्गाचं संरक्षण हे जीवनरक्षणाचाच अविभाज्य भाग असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
 
मोशाव नेवातिमची स्थापना कोचीहून इस्रायलमध्ये स्थलांतरित झालेल्या भारतीय ज्यू समुदायाने केली होती. आजही येथे त्यांची सांस्कृतिक वारसा जिवंत असून, पारंपरिक कोचीन शैलीतील सभास्थान तसेच भारतातील ज्यू वारसा जपणारं ‘भारत ज्यू हेरिटेज सेंटर’ येथे कार्यरत आहे.
Powered By Sangraha 9.0