उड्डाणाआधीच बिघाड लक्षात आला; पंकजा मुंडेंची हेलिकॉप्टर यात्रा रद्द, मोठा अनर्थ टळला

    03-Feb-2026
Total Views |
 
Pankaja Munde
 Image Source:(Internet)
छत्रपती संभाजीनगर:
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याची घटना समोर आली असून, वेळेत सतर्कता बाळगल्यामुळे संभाव्य अपघात टळला आहे. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या हेलिकॉप्टरने जाणार होत्या; मात्र उड्डाण सुरू होण्याआधीच हा बिघाड वैमानिकाच्या निदर्शनास आला.
 
पंकजा मुंडे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून आज लातूर जिल्ह्यात त्यांच्या अनेक प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून त्या हेलिकॉप्टरने रवाना होण्याच्या तयारीत असतानाच तांत्रिक दोष आढळून आला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तात्काळ उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिघाड वेळेत समजल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पर्यायी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
सभांचे वेळापत्रक थोडक्यात बदलले, दौरा सुरूच-
या घटनेमुळे पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील प्रचार सभांच्या वेळांमध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. मात्र कार्यकर्ते आणि मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी त्या सर्व नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झालेल्या विलंबानंतरही पंकजा मुंडेंचा प्रचार दौरा नियोजनानुसार सुरू राहणार असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मिळताच समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे.