Image Source:(Internet)
पुणे:
पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) महापौरपदाची सूत्रे आता भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या हाती जाणार असून, शहराच्या प्रशासनात महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. महापौरपदासाठी एकमेव उमेदवार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होत असून अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर राष्ट्रवादीने महापौर तसेच उपमहापौर पदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील चर्चेचा हा थेट परिणाम मानला जात असून त्यामुळे भाजपला महापालिकेत सत्ता अधिक बळकट करण्याची संधी मिळाली आहे.
सिंहगड रोड भागातून पहिलीच महापौर-
मंजूषा नागपुरे या सिंहगड रोड परिसराचे प्रतिनिधित्व करतात आणि त्या सलग तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक 35, सनसिटी–माणिकबाग येथून बिनविरोध विजय मिळवला होता. त्यांच्या निवडीमुळे सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळाला आहे.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी आधीच बिनविरोध निवडीचा निर्णय झाल्याने प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडलेली नाही. ही निवड प्रक्रिया शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पूर्ण झाली आहे.
उपमहापौरपदी परशुराम वाडेकर-
उपमहापौरपदासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे परशुराम वाडेकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पक्षाच्या बैठकीत महापौर व उपमहापौरपदाच्या नावांवर अधिकृत शिक्का मारला.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा जल्लोष टाळण्याच्या सूचना भाजपकडून नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. फटाके, बॅनर, गुलाल यावर बंदी ठेवण्याबाबत सभागृह नेते गणेश बिडकर यांनी स्पष्ट मार्गदर्शन केले आहे.
भाजपची मजबूत सत्ता, महिलांचा वाढता सहभाग-
पुणे महापालिकेत भाजपचे एकूण 119 नगरसेवक निवडून आले असून पक्षाची एकहाती सत्ता कायम राहिली आहे. यंदा महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव होते. भाजपने मोठ्या प्रमाणात महिलांना उमेदवारी दिली असून त्यापैकी 50 पेक्षा अधिक महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेत महिलांचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व अधिक सक्षम झाले असून शहराच्या कारभारात नवे पर्व सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.