अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय होणार; महसूल मंत्री बावनकुळेंची ग्वाही

03 Feb 2026 11:53:37
 
Chandrashekhar Bawankule
 Image Source:(Internet)
मुंबई 
राज्यातील आर्थिक अडचणीत अडकलेल्या गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार लवकरच कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांनी स्पष्ट केलं आहे. शेतकऱ्यांशी केलेला शब्द महायुती सरकार नक्कीच पाळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
दीर्घकाळ कर्जाच्या ओझ्याखाली शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकरी किंवा फार्महाऊसधारक या योजनेत समाविष्ट केले जाणार नसल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. वाढत्या कर्जासोबतच चढत्या व्याजामुळे शेतकरी मानसिक तणावात सापडत असून, अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहील, असंही त्यांनी नमूद केलं.
 
धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे आयोजित सभेत बोलताना बावनकुळे म्हणाले की, गरीब शेतकरी ३० ते ४० वर्षे कष्ट करून शेती करतो. मात्र कर्जबाजारीपणामुळे काही वेळा टोकाचे विचार मनात येतात. कोणत्याही शेतकऱ्याला आत्महत्येसारखं पाऊल उचलू द्यायचं नाही, ही सरकारची ठाम भूमिका आहे. पुढील काळात शेतकऱ्यांना वारंवार कर्ज घ्यावं लागू नये, यासाठीही सरकार धोरणात्मक उपाययोजना करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
 
बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे राज्यात शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कर्जमाफी फक्त गरीब शेतकऱ्यांपुरती मर्यादित राहणार असल्याने, पात्रतेचे निकष काय असतील, कोणाला लाभ मिळेल आणि कोण वगळला जाईल, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.
 
दरम्यान, काँग्रेसशासित राज्यांमध्ये ‘लाडकी बहीण’ योजना बंद केल्याचा आरोप करत बावनकुळे यांनी भाजपशासित राज्यांमध्ये ही योजना अखंड सुरू असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरूच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ योजनेअंतर्गत महिलांना विनातारण व विनाहमी पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
ही सभा धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती.
Powered By Sangraha 9.0