नागपुरात मध्यरात्री कैफेत राडा ; वादातून हिंसाचार, संपूर्ण कैफे जळून खाक!

03 Feb 2026 16:38:10
 
Clashes in a cafe
 Image Source:(Internet)
नागपूर:
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उशिरा रात्री एका कैफेमध्ये (Cafe) सुरू असलेल्या पार्टीदरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि त्यानंतर काही समाजकंटकांनी कैफेला आग लावली. या आगीत संपूर्ण कैफे जळून खाक झाला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कैफेमध्ये युवक-युवती मध्यरात्री पार्टी करत होते. दरम्यान, रात्री सुमारे दोनच्या सुमारास दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद काही वेळातच हाणामारीत बदलला. हाणामारीनंतर एका गटाने संतप्त होऊन कैफेमध्ये आगजनी केली.
 
पोलीस व अग्निशमन दलाची तातडीची कारवाई-
घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलीस तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत कैफे पूर्णतः जळून खाक झाला होता. घटनेनंतर कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू, आरोपींचा शोध-
या प्रकरणात फिर्यादी ऋषिकेश राजेश वाघमारे (वय 26), रा. प्लॉट क्रमांक 552, गौतम वाचनालयाजवळ, सिरसपेठ, रेशीमबाग, नागपूर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींमध्ये फैजल शेख (वय 21), रा. महिंद्रा नागा, गल्ली क्रमांक 5, राणी दुर्गावती चौक, नागपूर तसेच त्याचे 7 ते 8 साथीदार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
पोलीस घटनेची तारीख, वेळ आणि ठिकाण याच्या आधारे सखोल तपास करत असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. सध्या गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
Powered By Sangraha 9.0