Image Source:(Internet)
बदलापूर:
बदलापूरात (Badlapur) पुन्हा एकदा अल्पवयीन विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. शाळेच्या बसमध्येच एका विद्यार्थिनीशी बस चालकाने गैरवर्तन केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरमधील एका खासगी शाळेची बस नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घरी सोडत होती. संबंधित विद्यार्थिनीला घरी सोडताना चालकाने तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. बसमध्ये त्या वेळी कोणतीही महिला मदतनीस उपस्थित नसल्याचेही समोर आले आहे.
घडलेला प्रकार विद्यार्थिनीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी तातडीने बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध POCSO Act तसेच SC/ST (Prevention of Atrocities) Act अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह-
या घटनेनंतर शाळेच्या बसमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः मुलींसोबत महिला मदतनीस असणे बंधनकारक असताना ती अनुपस्थित का होती, याबाबत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, बसचे नियमित निरीक्षण आणि चालकांची पार्श्वभूमी तपासणी याकडे शाळा प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.
पूर्वीची घटना ताजी-
काही दिवसांपूर्वीही बदलापूरमध्ये शाळेच्या वाहनाशी संबंधित गंभीर प्रकार उघडकीस आला होता. एका व्हॅन चालकावर चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली होती. त्यामुळे अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.
दरम्यान, या ताज्या घटनेमुळे बदलापूर परिसरात खळबळ उडाली असून पालकांकडून शाळा प्रशासन आणि परिवहन व्यवस्थेवर कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिस तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.