Image Source:(Internet)
मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना शौचालय घोटाळा आरोप प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता करत खालच्या न्यायालयाचा निर्णय पलटवला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणात भाजप नेते किरिट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती. राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर कथित शौचालय घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता.
यापूर्वी माजगाव येथील दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना दोषी ठरवत १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावला होता. या निर्णयाविरोधात राऊत यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले. त्यावेळी सत्र न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली होती.
अखेर आज झालेल्या अंतिम सुनावणीत सत्र न्यायालयाने पुराव्यांचा पुनर्विचार करत राऊत यांची निर्दोष मुक्तता जाहीर केली. त्यामुळे खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरला.
या निकालामुळे राऊत समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सोमय्या गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, या निर्णयानंतर संबंधित पक्षांकडून पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.