संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा धक्का; वाल्मिक कराड यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

    26-Feb-2026
Total Views |
 
Santosh Deshmukh murder case
 Image Source:(Internet)
बीड :
राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी व कथित सूत्रधार वाल्मिक कराड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. कराड यांनी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
 
मस्साजोग (ता. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही महिन्यांपूर्वी अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे खंडणीचे कारण असल्याचा आरोप देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केला होता. या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. तपासादरम्यान वाल्मिक कराड हे या कटाचे प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
 
दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे जिवंत असून तो गावी टिंडा येथे येऊन गेला असल्याचा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. आंधळे मोबाईलचा वापर करत नसल्याने त्याचा माग काढणे अवघड जात असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या खबऱ्यांचे जाळे निष्क्रिय ठरत असल्याचा आरोपही कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
 
वाल्मिक कराड हे परळी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष असून मंत्री धंनजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनात त्यांचा प्रभाव राहिला आहे.मुंडे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रमुख नेते असून सध्या राज्य मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सांभाळत आहेत.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता या खटल्याची सुनावणी आणि पुढील तपास प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल का, आणि फरार आरोपीला अटक कधी होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.