Image Source:(Internet)
बारामती :
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत वाढत चाललेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज बारामती पोलिस ठाण्यात धडक दिली. अपघातप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
याआधी रोहित पवार यांनी मुंबईतील मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याने त्यांनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवला. “गुन्हा दाखल करण्यास नकार देण्यामागे कुणाचा दबाव आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
आज बारामती पोलिस स्टेशनबाहेर मोठ्या संख्येने नागरिक आणि अजितदादा समर्थक जमा झाले होते. ‘एकच वादा, अजितदादा’, ‘अमर रहे अजितदादा’, ‘परत या दादा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. समर्थकांनी भावनिक वातावरणात “आमच्या दादांना न्याय मिळवून द्या” अशी आर्त मागणी केली.
या वेळी रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार तसेच योगेंद्र पवार उपस्थित होते. पवार कुटुंबीयांना साथ देण्यासाठी बारामतीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
दरम्यान, अपघातप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि संबंधित VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात यासंदर्भात रोहित पवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली होती.
बारामतीत एफआयआर नोंदवला जातो का, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, चौकशीची मागणी आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.