Image Source:(Internet)
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी अधिकृतरीत्या केली.
यावेळी बोलताना पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस नव्या जोमाने उभी राहील आणि संघटनात्मक बळ अधिक मजबूत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
आपल्या भाषणात पटेल यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वगुणांची आठवण करून दिली. “नेतृत्व कर्तृत्वावर उभं असतं, पदावर नाही. दादा हे खऱ्या अर्थाने लढवय्ये नेते होते. त्यांनी कधीही परिस्थितीसमोर हार मानली नाही. कार्यकर्त्यांबद्दल त्यांना अपार आत्मीयता होती,” अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. राष्ट्रवादीच्या वाढीमध्ये आणि वैभवाच्या काळात त्यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अधिवेशनात पटेल यांनी नाव न घेता आमदार रोहित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. “काही लोकांना पक्ष चालवण्याचे सल्ले देण्याची हौस झाली आहे. ज्यांचा आमच्याशी थेट संबंध नाही, तेच आम्हाला उपदेश करत आहेत. काहींच्या बोलण्यात आणि कृतीत विसंगती दिसते,” असा टोला त्यांनी लगावला.
उल्लेखनीय म्हणजे, अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. मुंबईहून बारामतीकडे जात असताना हा अपघात घडला. त्यांच्या निधनानंतर तीन दिवसांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पक्षाध्यक्षपदाबाबत विविध तर्कवितर्क रंगले होते. अखेर आज त्या चर्चांना अधिकृत पूर्णविराम मिळाला.
राजकीय पार्श्वभूमी पाहता, सुनेत्रा पवार यांनी २०२४ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्या लवकरच राज्यसभेचा राजीनामा देऊन बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे राजकीय वर्तुळात दिसत आहेत.