Image Source:(Internet)
अकोला :
राज्यातील खासगी सावकारी आणि सहकार विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा विधानसभेत जोरदारपणे उपस्थित करण्यात आला. अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर (Randhir Savarkar) यांनी लक्षवेधी सूचनेवर बोलताना अकोला जिल्ह्यातील खासगी सावकारी प्रकरणे तसेच मंत्रालयीन सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या कथित गैरप्रकारांचा पर्दाफाश करत कठोर कारवाईची मागणी केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याला खासगी सावकारांच्या कर्जबाजारीपणामुळे मूत्रपिंड विकण्याची वेळ आल्याच्या धक्कादायक प्रकरणावर सभागृहात चर्चा सुरू असताना हा मुद्दा अधिकच तीव्र झाला. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा आरोपही करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आमदार सावरकर यांनी अकोला जिल्ह्यातील खासगी सावकारी आणि सहकार विभागातील अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा आरोप करत प्रश्न उपस्थित केला.
अकोल्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांचा उल्लेख करत सावरकर यांनी गंभीर आरोप मांडले. एखाद्या डीडीआर अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन वेळा रंगेहाथ पकडूनही त्याच्यावर ठोस कारवाई न करता इतरत्र बदली करून चौकशीला परवानगी नाकारली जाते, हे कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा अधिकाऱ्यांना सरकारकडून पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय संबंधित अधिकारी एका जीएसटी अधिकाऱ्यासोबत संगनमत करताना पकडला गेल्यानंतरही त्याची अकोल्यात नियुक्ती कशी करण्यात आली, याबाबत त्यांनी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले. सहकार विभागातील भ्रष्टाचारामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार सावरकर यांनी केली.
या प्रकरणामुळे सहकार विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.