अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’, पुढील ४८ तास महत्त्वाचे

    23-Feb-2026
Total Views |
 
Yellow alert
Image Source:(Internet) 
मुंबई :
राज्यात पुन्हा एकदा हवामानाने अचानक पलटी घेतली असून अवकाळी पावसाने (Unseasonal rains) अनेक जिल्ह्यांना झोडपले आहे. India Meteorological Department (हवामान विभाग) यांनी पुढील दोन दिवसांसाठी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देत ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
 
रविवारी मध्यरात्रीनंतर विदर्भातील नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या सरींमुळे काहीसा दिलासा मिळाला; मात्र जोरदार वाऱ्यामुळे काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना समोर आल्या.
 
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसह विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर येथे विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
 
मध्य महाराष्ट्रातील सोलापूर तसेच नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात ढगाळ वातावरण असून हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी अचानक वाऱ्याचा वेग वाढण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 
नागपुरात सुरुवातीला केवळ ढगाळ वातावरणाचा अंदाज होता. मात्र मध्यरात्रीनंतर ढगांचा गडगडाट सुरू होऊन जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शहरातील काही भागांत झाडांच्या फांद्या तुटण्याच्या किरकोळ घटना घडल्या. विजेच्या तारा व उपकरणांवर परिणाम झाल्याने काही भागांत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झाला.
 
या अनपेक्षित अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील काही तास राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.