Image Source:(Internet)
नागपूर :
शहरातील अजनी भागात हरवलेल्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा शोध नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अवघ्या एका तासात लावून कुटुंबीयांना मोठा दिलासा दिला. पोलिसांच्या तत्पर आणि समन्वयित हालचालींमुळे संभाव्य अनर्थ टळला.
नाईक नगर परिसरातील प्लॉट क्रमांक ११८ येथे राहणारे राहुल लोखंडे यांनी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता अजनी पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन आपल्या चार वर्षीय मुलगा विहान राहुल लोखंडे हा सायंकाळी ५ वाजल्यापासून घरातून दिसत नसल्याची माहिती दिली. तक्रार नोंद होताच पोलिसांनी तातडीने हालचाल सुरू केली.
घटनेची माहिती पोलीस कंट्रोल रूममार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यानंतर अजनी पोलिसांसोबत बेलतरोडी, हुडकेश्वर, इमामवाडा, नंदनवन आणि सक्करदरा पोलीस ठाण्यांची पथके शोधकार्यात सहभागी झाली. परिसरात नाकाबंदी करून तपास सुरू करण्यात आला.
झोन-४च्या पोलिस उपायुक्त रश्मिता राव तसेच अजनी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त हिवरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत संपूर्ण शोधमोहीमेवर लक्ष ठेवले. कुटुंबीयांकडून आवश्यक माहिती घेतल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली.
तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण शोधमोहीमेदरम्यान सुखद माहिती समोर आली. संबंधित बालक घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत गाढ झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलगा सुखरूप असल्याची खात्री होताच कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या दरम्यान स्थानिक नगरसेविका भारती बुंदे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती प्रसारित करून सहकार्य केले.
ही कारवाई पोलिस उपायुक्त रश्मिता राव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांच्या नेतृत्वात पार पडली. पोलिस उपनिरीक्षक सिद्धांत मसके, हेड कॉन्स्टेबल मनोज नेवारे, अविनाश चांगोले यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम यशस्वी केली.
नागपूर शहर पोलिसांच्या सजग आणि वेगवान प्रतिसादामुळे चिमुकल्याचा सुरक्षित शोध लागला असून, आपत्कालीन परिस्थितीत पोलिस यंत्रणा किती तत्परतेने काम करते याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.