अकोटमध्ये ५०० च्या बनावट नोटांचा सुळसुळाट; अकोला जिल्ह्यात रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा

    23-Feb-2026
Total Views |
 
Fake Rs 500 notes found in Akola
 Image Source:(Internet)
अकोला :
जिल्ह्यातील अकोट शहरात ५०० रुपयांच्या बनावट (Fake) नोटा चलनात आढळल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका घटनेनंतर या प्रकरणाची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. अकोटमधील नरसिंग मार्ग परिसरात एका चप्पल दुरुस्ती करणाऱ्या छोट्या व्यावसायिकाला अनोळखी महिलेने ५०० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटा देऊन गंडवल्याची घटना समोर आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला तोंडाला स्कार्फ बांधून दुकानात आली होती. गर्दीचा फायदा घेत तिने व्यवहार केला आणि निघून गेली. मात्र दुसऱ्या दिवशी पैसे मोजताना संबंधित नोटा बनावट असल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
 
या घटनेमुळे अकोटमध्ये बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय झाले आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, याआधीही २० जुलै २०२५ रोजी अकोट शहरातील ‘श्रीराम सुपर शॉपी’मध्ये अशाच प्रकारे ५०० रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक झाल्याची घटना घडली होती. त्या वेळीही एका महिलेनेच दुकानदाराला गंडवल्याचे सांगितले गेले होते.
 
सध्या मुख्य बाजारपेठांसह छोट्या दुकानांमध्ये आणि रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. १००, ५० आणि ५०० रुपयांच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटा चलनात पसरवल्या जात असल्याने किरकोळ व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. अनेकांना नोटा बनावट असल्याचे व्यवहारानंतरच लक्षात येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
 
दरम्यान, पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी व्यापाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बनावट नोटांच्या वाढत्या घटनांमुळे अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा बनावट चलन रॅकेटचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.