नागपुरात अँटी नार्कोटिक्स पथकाची धडाकेबाज कारवाई; ५०५ किलो गांजा हस्तगत

    23-Feb-2026
Total Views |
राज्याबाहेरील तस्करी साखळी उघड

Anti-narcotics squad 
नागपूर :
अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला गती देत नागपूर (Nagpur) पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने मोठी कारवाई केली आहे. मौदा तालुक्यातील माथनी टोल प्लाझा परिसरात सापळा रचून एका ट्रकमधून तब्बल ५०५ किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून ही खेप ओडिशातून गुप्तपणे नागपुरात आणली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.
 
विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने सोमवारी पहाटेच मौदा परिसरात नजर ठेवली. तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयित वाहनाचा माग काढण्यात आला. माथनी टोल नाक्यावर ट्रक अडवून झडती घेतली असता, मालवाहू वाहनात लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील गांजा आढळून आला.
 
दरम्यान, यापूर्वी झिंगाबाई टाकळी परिसरात छापा टाकून पोलिसांनी अब्दुल वहीद उर्फ ‘खोका’ या कुख्यात तस्कराला अटक केली होती. तो आपल्या सासरच्या घरातूनच अमली पदार्थांचा व्यवहार चालवत असल्याचे उघडकीस आले. त्या कारवाईत सुमारे ७५ किलो गांजा जप्त करण्यात आला होता.
 
अटकेतील आरोपीच्या मोबाईलमधील तपासात ओडिशातील एका संशयित संपर्काचा तपशील समोर आला. संबंधित ट्रक नागपूरकडे येत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी टोल नाक्यावर जाळे टाकत ही मोठी कारवाई यशस्वी केली.
 
सध्या ट्रकचालकाची कसून चौकशी सुरू असून या आंतरराज्यीय गांजा तस्करी साखळीतील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.