Image Source:(Internet)
मुंबई :
ग्लोबल एआय परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निषेधामुळे राजकीय वातावरण तापले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी इंडियन युवा काँग्रेसवर कठोर शब्दांत टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या तंत्रज्ञान क्षमतेचे प्रदर्शन होत असताना अशा प्रकारचे आंदोलन करणे हे देशाच्या प्रतिमेला धक्का देणारे असल्याचे त्यांनी म्हटले.
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, एआय क्षेत्रातील भारताची प्रगती आणि नेतृत्व अधोरेखित करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची होती. “जागतिक पातळीवर देशाची सकारात्मक ओळख निर्माण होत असताना काही जणांकडून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
भारत मंडपम येथे घोषणाबाजी
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’दरम्यान युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन छेडले. काही कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून अंगावरील शर्ट काढल्याची घटना घडली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले.
युवा काँग्रेसच्या निवेदनानुसार, परिषदेत देशाच्या हिताशी संबंधित मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलन केले.
राहुल गांधी व मल्लिकार्जुन खड़गे यांची टीका
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या परिषदेच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित करत, “देशातील प्रतिभा आणि माहितीचा प्रभावी वापर करण्याऐवजी कार्यक्रम केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे दिसते,” असे म्हटले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही व्यवस्थापनातील त्रुटींवर बोट ठेवत, “उपस्थितांना अन्न-पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत अडचणी आल्या,” असा दावा केला.
वाढता राजकीय वाद-
भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कामगिरीचे जागतिक स्तरावर प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने आयोजित परिषदेभोवती आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उठले आहे. आंदोलनानंतर हा मुद्दा अधिकच गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.