ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ घोषणेनंतर सोन्याच्या दरात उसळी; देशभरात किमती वाढल्या

    21-Feb-2026
Total Views |
 
gold
मुंबई:
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याच्या (Gold) किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. अमेरिकेतील राजकीय आणि आर्थिक निर्णयांचा थेट परिणाम जागतिक सराफा बाजारावर दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या जागतिक टॅरिफची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवला आहे.
 
दरम्यान, सुप्रीम कोर्ट ऑफ युनायटेड स्टेट यांनी ट्रम्प यांच्या आधीच्या शुल्क निर्णयाला बेकायदेशीर ठरवत तो रद्द केला. त्यानंतर ट्रम्प यांनी जगभरातील आयातीवर 10 टक्के शुल्क लादण्याची घोषणा केली. या घडामोडींमुळे बाजारात अस्थिरता वाढली आणि सोन्याच्या किमतींना आधार मिळाला.
 
शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 1.5 टक्क्यांनी वाढून 5,071.48 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. एप्रिल डिलिव्हरीसाठी यूएस गोल्ड फ्युचर्स 1.7 टक्क्यांनी वाढून 5,080.90 डॉलरवर बंद झाले. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची वाढ चौथ्या तिमाहीत 1.4 टक्क्यांवर घसरली असून अर्थतज्ज्ञांच्या 3 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा ती खूपच कमी ठरली.
 
भारतात Multi Commodity Exchange of India (MCX) वरील एप्रिल फ्युचर्स करार 0.07 टक्क्यांनी वाढून 1,56,993 प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. शनिवारी बाजार बंद आहे. Indian Bullion and Jewellers Association (IBJA) नुसार आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,55,066, 23 कॅरेट 1,54,445, 22 कॅरेट 1,42,040, 18 कॅरेट 1,16,300 आणि 14 कॅरेट 90,714 प्रति 10 ग्रॅम आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे.
 
दिल्ली 1,57,520, मुंबई₹1,57,370, कोलकाता 1,57,370, चेन्नई 1,57,310, जयपूर 1,57,520, नागपूर 1,57,370, पुणे 1,57,370, अहमदाबाद 1,57,420, लखनौ 1,57,520 आणि गुरुग्राम 1,57,520. बहुतांश शहरांमध्ये 22 कॅरेटचा दर 1,44,200 ते 1,44,400 दरम्यान आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वॉल स्ट्रीटमध्येही सकारात्मक हालचाल दिसून आली. मात्र अमेरिकेतील सरकारी खर्चातील कपात आणि ग्राहक खर्चातील मंदी यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची अनिश्चितता कायम आहे.
 
तज्ज्ञांच्या मते, जागतिक राजकीय तणाव आणि आर्थिक अस्थिरता कायम राहिल्यास सोन्याच्या किमतींमध्ये आणखी चढ-उतार होऊ शकतात. लग्नसराईच्या हंगामात वाढलेले दर ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत.