Image Source:(Internet)
नागपूर :
वाठोडा (Vathoda) पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिजामाता नगर परिसरात सुरू असलेल्या जुगारप्रकरणी पोलिसांनी धाड टाकत नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. कारवाईदरम्यान ५,४२० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या शोध पथकाने गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास प्लॉट क्रमांक ६४, जिजामाता नगर येथे मनोज बावणे यांच्या घरामागील मोकळ्या जागेवर छापा टाकला. तेथे काही जण पत्त्यांच्या साहाय्याने पैशांची बाजी लावत जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.
मनोज कृष्णा बावणे (२३), घनश्याम मुरलीधर दाणी (२९), जितेश डेकाटे (३२), आयुष सोनारघरे (२२), विकास कांबळे (२२), यश झाडे (२३), प्रितम सलामे (३२), किशोर बावणे (२८) आणि रोहित कच्छावा (३०) अशी कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे असून ते सर्व नंदनवन परिसरातील रहिवासी आहेत.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाठोडा पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त निकेतन कदम (झोन ५) आणि सहाय्यक पोलिस आयुक्त रोहित ओव्हाळ (कळमना विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.