Image Source:(Internet)
नागपूर :
शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) एका अधिकाऱ्यावर गणवेश न परिधान करता ड्युटी बजावत असताना वाहनचालकांकडून बेकायदेशीर पैसे उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून शहरात चर्चा रंगली आहे.
व्हिडिओमध्ये संबंधित अधिकारी आरटीओच्या फ्लाइंग स्क्वॉडची MH 04 – LT 6631 क्रमांकाची गाडीत बसलेले दिसतात. मात्र त्यांनी अधिकृत गणवेश परिधान केलेला नसल्याचे दिसून येते. व्हिडिओ चित्रीकरण करणारी व्यक्ती स्वतःला ट्रक चालक असल्याचे सांगत असून, चलन कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांवर थेट आरोप करताना ऐकू येते.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी नागपूरातील कळमना परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये काही नागरिक संबंधित अधिकाऱ्याला घेराव घालत प्रश्न विचारताना दिसतात. गणवेशाशिवाय कारवाई कशी केली आणि बेकायदेशीर पैसे का घेतले, असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.
व्हिडिओ समोर आल्यानंतर नागपूर शहर आरटीओ प्रशासनाने स्पष्टीकरण जारी केले. त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित कर्मचारी नियमित तपासणी मोहिमेअंतर्गत कर्तव्य बजावत होते. व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आरोप निराधार असून, चलन प्रक्रियेदरम्यान मुद्दाम चित्रीकरण करून चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
या संदर्भात कळमना पोलीस ठाणे येथे संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना संबंधित आरटीओ अधिकारी मंगेश राठोड यांनी सांगितले की, ते नियमित तपासणी करत होते. एका व्यक्तीने चलन कारवाईदरम्यान चित्रीकरण करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यांच्यावरील आरोप तथ्यहीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे आरटीओ कारवाईतील पारदर्शकता आणि अधिकाऱ्यांनी गणवेश परिधान करण्याच्या नियमांबाबत चर्चा सुरू झाली असून, पुढील तपासानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.