Image Source:(Internet)
लखनऊ :
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी सकाळी लखनऊ (Lucknow) येथे दाखल झाले. येथून ते थेट सुलतानपूरकडे रवाना झाले असून, तेथे खासदार-आमदार (एमपी-एमएलए) न्यायालयात त्यांना आपला जबाब नोंदवायचा आहे.
हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंधित कथित मानहानी प्रकरणाशी जोडलेले आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी सांगितले की, न्यायालयीन प्रक्रियेसाठीच राहुल गांधी लखनऊ येथे आले असून, सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ते त्याच दिवशी दिल्लीला परतणार आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
२०१८ मध्ये भाजप नेते विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी त्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
गेल्या पाच वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. डिसेंबर २०२३ मध्ये न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने राहुल गांधी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले. विशेष दंडाधिकाऱ्यांनी त्यांना २५ हजार रुपयांच्या दोन जामीनदारांवर जामीन मंजूर केला होता.
राजकीय वातावरण तापले
२६ जुलै २०२४ रोजी राहुल गांधी यांनी न्यायालयात स्वतःला निर्दोष घोषित करत हे प्रकरण राजकीय कट असल्याचा आरोप केला होता. पुढील सुनावणीदरम्यान न्यायालयाने तक्रारदार पक्षाला पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, सुलतानपूरमध्ये राहुल गांधी यांच्या हजेरीपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘सत्यमेव जयते’ असे पोस्टर्स लावले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.