‘केरला स्टोरी 2’वरून वाद; इरफान अंसारी यांची चित्रपटावर बंदीची मागणी

    20-Feb-2026
Total Views |
 
Kerala Story 2
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
कथितपणे येऊ घातलेल्या ‘केरला स्टोरी 2’ (Kerala Story 2) या चित्रपटावरून पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे. झारखंड सरकारमधील मंत्री इरफान अंसारी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेत राज्यात त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
 
रांची येथे माध्यमांशी बोलताना अंसारी यांनी चित्रपटावर टीका केली. “सध्या काही निवडणूक आहे का? मग भाजपचा हेतू समजून घ्या. हा चित्रपट दाखवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. विशेषतः मातां-बहिणींच्या मनावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा चित्रपटांना सेन्सॉर बोर्ड मंजुरी देत आहे, हेही चुकीचे आहे. जर हा चित्रपट झारखंडमध्ये प्रदर्शित झाला, तर ते योग्य ठरणार नाही,” असे ते म्हणाले.
 
यापूर्वी प्रदर्शित झालेल्या The Kerala Story या चित्रपटावरून देशभरात मोठा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला होता. काही राज्यांत आंदोलन झाले, तर काही राज्यांनी चित्रपटाला करमुक्त दर्जा दिला होता. आता कथित सिक्वेल ‘केरल स्टोरी 2’मुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
 
दरम्यान, चित्रपटाला प्रमाणपत्र देणाऱ्या Central Board of Film Certification (CBFC) च्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अशा चित्रपटांना प्रमाणपत्र देणे म्हणजे समाजात चुकीचा संदेश जाणे होय, असे अंसारी यांनी म्हटले आहे.
 
मात्र या संदर्भात अद्याप कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे झारखंडमध्ये ‘केरला स्टोरी 2’च्या प्रदर्शनावर बंदी येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.