Image Source:(Internet)
नाशिक : उन्हाळ्याची चाहूल लागताच थंडगार कुल्फीची मागणी वाढते. मात्र याच मागणीचा गैरफायदा घेत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका टोळीचा भांडाफोड नाशिक (Nashik) ग्रामीण पोलिसांनी केला आहे. इगतपुरी तालुक्यातील चर्च हिल परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या कुल्फी उत्पादन केंद्रावर छापा टाकून तब्बल २५०० तयार कुल्फ्या आणि मोठ्या प्रमाणावर हानिकारक केमिकल्स जप्त करण्यात आले.
गुप्त माहितीनुसार, या ठिकाणी दूध वा मलाईऐवजी केवळ केमिकल्स, इसेन्स आणि रंगांचा वापर करून ‘मलाई कुल्फी’ तयार केली जात होती. अत्यंत अस्वच्छ वातावरणात आणि कोणत्याही परवान्याविना हा उद्योग सुरू असल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळी साठवलेले विविध फ्लेवर इसेन्स, कृत्रिम रंग आणि रासायनिक पदार्थ ताब्यात घेतले आहेत.
या कारवाईत अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागालाही पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासात कुल्फी बनवताना दुधाचा लवलेशही नसल्याचे समोर आले. त्याऐवजी आरोग्यास अपायकारक ठरू शकणाऱ्या कृत्रिम रंगद्रव्यांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. जप्त केलेल्या कुल्फ्यांचे आणि केमिकल्सचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कठोर कारवाई केली जाणार आहे.
इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई पार पडली. या प्रकरणी विनोद कुशवाह या संशयिताविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी पालकांना विशेष आवाहन केले आहे. दुधाच्या वाढत्या किमती लक्षात घेता ५ किंवा १० रुपयांत अस्सल मलाई कुल्फी मिळणे अशक्य आहे. स्वस्ताच्या मोहात पडून नागरिकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याशी तडजोड करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बाजारभाव आणि विक्रीदरातील मोठी तफावत ही भेसळीची स्पष्ट खूण असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळ प्रकरण उघडकीस आल्यानंतर लगेचच नाशिकमधील हे ‘केमिकल कुल्फी’ प्रकरण समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अन्न भेसळीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.