Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारित शहरातील कन्स्ट्रक्शन व डिमॉलिश (C&D) कचरा संकलन व प्रक्रिया करण्याचे कंत्राट राम नाईकी या खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांतून जमा होणारा C&D कचरा भांडेवाडी (Bhandewadi) येथील प्रकल्पात प्रक्रिया करून ४० मिमी, २० मिमी, १० मिमी गिट्टी, रेती व माती स्वरूपात बायप्रॉडक्ट तयार करण्यात येतो. या कामासाठी महानगरपालिका कंपनीला प्रतिटन ४५० रुपये इतका मोबदला देते.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने काम करणाऱ्या ९ भूमिपुत्र कामगारांना मागील १५ दिवसांपासून अचानक कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना बाहेरचा रस्ता दाखवत “आम्ही महाराष्ट्राचा कायदा मानत नाही. ८ हजार रुपयांत १२ तास काम करायचे असेल तर करा, अन्यथा नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते नितीन तिवारी यांनी कार्यकर्त्यांसह थेट भांडेवाडी येथील प्रकल्पात जाऊन कंपनी व्यवस्थापक सगीर अहमद यांना जाब विचारला. महाराष्ट्राचा कायदा न मानण्याच्या कथित भूमिकेवरून तिवारी यांनी तीव्र संताप व्यक्त करत कंपनी व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले.
यावेळी तिवारी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कंपनीच्या कथित गैरप्रकारांची माहिती दिली. तसेच, काढून टाकलेल्या कामगारांना ४८ तासांच्या आत पुन्हा कामावर न घेतल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने नागपूर महानगरपालिकेत उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. गरज पडल्यास कंपनीच्या कारभाराची पोलखोल करून प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनावेळी प्रीतम कापसे, मुन्ना तिवारी, आशीष हाडगे, अब्बास अली, कार्तिक करोसिया, अभिषेक माहुरे, ललित बावनकर, मुकेश सूर्यवंशी, सचिन भगत, सोनू शेख यांच्यासह संबंधित कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.