भाजपचा मोठा मास्टरस्ट्रोक; अमरावती महापालिकेत पहिल्यांदाच सिंधी समाजाला महापौरपदाची संधी

    02-Feb-2026
Total Views |
 
Amravati Municipal Corporation
 Image Source:(Internet)
अमरावती:
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) वर्चस्व सिद्ध करत 29 पैकी तब्बल 27 महापालिकांवर सत्ता मिळवली आहे. मात्र, सत्ताधारी पक्ष एकत्र असतानाही अनेक ठिकाणी निवडणुकीदरम्यान परस्परांवर टीकेची झोड उठल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. निकालानंतरही अनेक महापालिकांमध्ये महापौरपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.
 
मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून सुरू असलेले राजकारण अद्यापही थांबलेले नाही. मराठी, हिंदू, मुस्लिम की उत्तर भारतीय चेहरा महापौरपदी बसणार, यावरून मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. त्यामुळे मुंबईचा महापौर कोण होणार, याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.
 
दरम्यान, अमरावती महानगरपालिकेत भाजपने एक महत्त्वाची आणि राजकीयदृष्ट्या लक्षवेधी खेळी खेळली आहे. अमरावती महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) यांची आघाडी सत्तास्थापन करणार आहे.
 
भाजपच्या अंतर्गत बैठकीत महापौरपदाच्या कार्यकाळाबाबत स्पष्ट तोडगा काढण्यात आला आहे. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार, सुरुवातीची अडीच वर्षे भाजपकडे महापौरपद राहणार आहे. या कालावधीत पहिल्या सव्वा वर्षांसाठी भाजपचे नगरसेवक श्रीचंद तेजवानी महापौरपदाची धुरा सांभाळणार असून, त्यानंतर उर्वरित सव्वा वर्षांसाठी आशिष अतकरे यांना महापौरपद देण्यात येणार आहे.
 
विशेष बाब म्हणजे, महाराष्ट्रात भाजपकडून सिंधी समाजातील पहिल्या महापौराची नियुक्ती होत आहे. श्रीचंद तेजवानी यांना ही संधी देत भाजपने सामाजिक समतोल साधण्याचा आणि नव्या मतदारवर्गाला आकर्षित करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
 
६ फेब्रुवारी रोजी महापौरपदाची अधिकृत निवडणूक होणार असून, त्याआधीच भाजपने आज अधिकृतपणे महापौरपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच, सत्तेच्या दुसऱ्या अडीच वर्षांच्या कालावधीत युवा स्वाभिमान पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना महापौरपद देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 
अमरावतीतील हा सत्ता-फॉर्म्युला आणि सिंधी समाजाला मिळालेली ऐतिहासिक संधी, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.