Image Source:(Internet)
नागपूर :
चाइल्ड (Child) हेल्पलाईन १०९८ वर आलेल्या तक्रारीनंतर जिल्हा बाल संरक्षण यंत्रणांनी तातडीने कारवाई करत शहरातून तीन बालमजूरांची मुक्तता केली. बुधवारी करण्यात आलेल्या या मोहिमेत दोन मुलगे आणि एका मुलीची सुटका करण्यात आली.
ही कारवाई कडबी चौक परिसरातील रेल्वे म्युझियमजवळ करण्यात आली. चौकशीत संबंधित तिन्ही मुले मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असल्याचे उघड झाले. त्यांना कामावर लावल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप केला.
मुक्त करण्यात आलेल्या मुलांना तत्काळ समुपदेशन देण्यात आले असून त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित नियोक्त्यांविरोधात ‘बालमजुरी (प्रतिबंध व नियमन) कायदा’ अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बालमजुरीबाबत कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ही मोहीम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्या नेतृत्वात पार पडली. चाइल्ड हेल्पलाईनचे प्रतिनिधी अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धाडाडे आणि मंगला कुंभारे यांनीही या कारवाईत सहभाग घेतला.