Image Source:(Internet)
शिवनेरी :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणावर सुरू असलेल्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नव्या अर्थाने उजाळा दिला आहे. शिवनेरी येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “एकत्र काम करण्याची आमची इच्छा कालही होती, आजही आहे आणि पुढेही राहील. मात्र या विषयावर सध्या अधिक चर्चा नको,” असा मोजकाच पण अर्थपूर्ण संदेश त्यांनी दिला.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये संवाद सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात झालेल्या कथित बैठकींमुळे या चर्चांना अधिक हवा मिळाली. बैठकींच्या ठिकाणांपासून ते सीसीटीव्ही फुटेजपर्यंत विविध मुद्द्यांवर तर्कवितर्क लावले जात होते. यापूर्वी या विषयावर बोलताना सुळे यांनी “रामकृष्ण हरी” असे म्हणत प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते.
दरम्यान, त्यांनी रोहित पवार यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. “रोहित सातत्याने विविध मुद्दे मांडत आहेत. तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. पवार कुटुंबीयांसह असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना योग्य ती सुरक्षा द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
कौटुंबिक आणि राजकीय घडामोडींवर बोलताना त्यांनी भावनिक सूर लावत, “मोठ्यांविषयी सार्वजनिकपणे बोलणे आम्हाला आवडत नाही. काही गोष्टींची जाणीव दादालाही आहे आणि मलाही आहे,” असे सूचक विधान केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही गटांनी एकत्र लढण्याबाबत तसेच अमोल कोल्हे यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या चर्चांवर त्यांनी थेट भाष्य टाळले. “अमोल दादांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर अधिक काही बोलायचे नाही,” असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, अलीकडील विमान अपघाताच्या संदर्भात संसदेत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याचेही त्यांनी नमूद केले. “घटनेबाबत संपूर्ण पारदर्शक माहिती समोर येईपर्यंत आमची भूमिका कायम राहील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
एकंदरित, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबतचा निर्णय सध्या प्रलंबित असला, तरी ‘एकत्र काम’ करण्याची तयारी कायम असल्याचे स्पष्ट संकेत सुळे यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.