Image Source:(Internet)
नागपूर :
शहरातील कळमना (Kalamana) परिसरात अवैध शस्त्रसाठा ठेवून विक्री करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली आहे. घरफोडी पथकाच्या सापळा कारवाईत चार तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तुले, ३४ जिवंत काडतुसे, चार मॅगझिन आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले. जप्त साहित्याची अंदाजे किंमत १ लाख ७६ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुप्त माहितीवरून पहाटे छापा-
१९ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे गुन्हे शाखेला खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर भारतवाडा येथील शिवशंभू नगर परिसरात सापळा रचण्यात आला. शस्त्रसाठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शुभम बलराम जांगेळ (२४) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसे आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला.
तपासातून उलगडली साखळी-
चौकशीत जांगेळने सागर रमेश चौधरी (२७) याच्याकडून पिस्तुल विक्रीसाठी घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर चौधरीला अटक करण्यात आली. पुढील तपासात शस्त्रे श्रेयस अमरदीप यादव (२३) याच्याकडून मिळाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी यादवला जाम नगर परिसरातून अटक केली.
यादवच्या चौकशीत पर्डी येथील नवीन नगरमध्ये राहणाऱ्या वंश संतोष सिन्हा (१९) याच्याकडे शस्त्रसाठा लपवून ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी सिन्हाकडून जप्त केलेल्या पिशवीत दोन पिस्तुले, चार मॅगझिन आणि ३२ जिवंत काडतुसे आढळली.
उत्तर प्रदेशातून खरेदी-
प्राथमिक चौकशीत श्रेयस यादवने ही पिस्तुले उत्तर प्रदेशातील एका परिचिताकडून प्रत्येकी ३५ हजार रुपयांना खरेदी केल्याचे सांगितले. ती जास्त दराने विक्री करून आर्थिक लाभ मिळवण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
गुन्हा नोंद, तपास वेगात-
या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात शस्त्र कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू असून या प्रकरणामागील संभाव्य आंतरराज्यीय जाळ्याचा शोध घेतला जात आहे. जप्त मोबाईलमधील डिजिटल माहितीचे विश्लेषणही सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.