सूर्यग्रहण २०२६: वर्षातील पहिले कंकण ग्रहण आज; भारतात दिसणार नाही, तरीही खगोल-ज्योतिष क्षेत्रात उत्सुकता!

    17-Feb-2026
Total Views |
 
Solar Eclipse
 Image Source:(Internet)
 
आज, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Solar Eclipse) लागत आहे. हे पूर्ण स्वरूपाचे नसून कंकण प्रकारातील ग्रहण आहे. या प्रक्रियेदरम्यान चंद्र सूर्याच्या समोर येतो; मात्र तो सूर्याला संपूर्ण झाकत नाही. त्यामुळे सूर्याभोवती तेजस्वी वलय तयार होते. आकाशात उमटणारे हे दृश्य जणू अग्नीच्या वर्तुळासारखे भासते.
 
हे ग्रहण भारतात पाहता येणार नसले तरी खगोल अभ्यासकांसह ज्योतिषतज्ज्ञांचे त्याकडे विशेष लक्ष लागले आहे.
 
ग्रहणाची वेळ आणि स्वरूप-
१७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी ग्रहणाला प्रारंभ होणार आहे. कंकण स्वरूपामुळे सूर्य पूर्णपणे अदृश्य होणार नाही. भारतात दृश्यता नसल्याने येथे सूतक काळ मान्य केला जाणार नाही. त्यामुळे धार्मिक विधी, मंदिरे किंवा दैनंदिन व्यवहारांवर कोणतेही बंधन राहणार नाही.
 
कंकण ग्रहणाची वैशिष्ट्ये-
जेव्हा चंद्र पृथ्वी-सूर्याच्या मध्ये येतो, पण त्याचा भासमान व्यास सूर्यापेक्षा लहान ठरतो, तेव्हा सूर्याच्या कडा उजळून दिसतात. या उजळ वलयामुळे हे ग्रहण वेगळे ठरते. पूर्ण अंधार पडत नसल्याने वातावरणात विशेष प्रकाशमानता अनुभवायला मिळते.
 
कुंभ राशीत पंचग्रहांची एकत्र येणे-
या वेळी ग्रहण कुंभ राशीत होत असून दीर्घ कालावधीनंतर पंचग्रहांची एकत्रित स्थिती निर्माण होत आहे. सूर्य, चंद्र, बुध, शुक्र आणि राहु हे ग्रह कुंभ राशीत एकत्र येत असल्याने ज्योतिषीय दृष्टीने ही रचना महत्त्वाची मानली जाते.
तज्ज्ञांच्या मते, या योगाचा प्रभाव वेगवेगळ्या राशींवर भिन्न प्रकारे जाणवू शकतो. विशेषतः कुंभ राशीच्या व्यक्तींना नव्या घडामोडी, बदल आणि संधींचा काळ सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
कुठे दिसेल हे दृश्य?
दक्षिण अमेरिका, आफ्रिकेतील काही भाग, अंटार्क्टिका तसेच समुद्रावरील काही प्रदेशांत हे कंकण सूर्यग्रहण प्रत्यक्ष पाहता येणार आहे. खगोलप्रेमींसाठी हा एक दुर्मीळ आणि आकर्षक अनुभव ठरणार आहे.
 
संभाव्य परिणामांविषयी चर्चा-
राहु आणि सूर्य यांच्या समीपतेमुळे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात काही महत्त्वाच्या हालचाली दिसू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात नवे टप्पे गाठले जाऊ शकतात, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.
 
भारतामध्ये ग्रहणाचे प्रत्यक्ष दर्शन नसले तरी त्यासंबंधीची चर्चा आणि विश्लेषण यामुळे हा दिवस खगोल आणि ज्योतिष क्षेत्रात विशेष ठरत आहे.