Image Source:(Internet)
मुंबई :
देवगिरी बंगल्यावर काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीस आमदार हिरामण खोसकर उशिरा पोहोचले होते. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
खोसकर म्हणाले की, देवगिरीवरील बैठकीसंदर्भात त्यांना चार ते पाच फोन आले होते; मात्र ते नाशिकमध्ये विविध बैठकींमध्ये व्यस्त होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आंदोलन, घोटी-त्र्यंबक महामार्ग (सुमारे ८५० कोटींचा प्रकल्प) आणि २२ गावांवरील परिणाम, तसेच साधुग्राम आणि एमएसईबी संदर्भातील बैठका असल्याने त्यांना वेळेत पोहोचता आले नाही. वाहतूक कोंडीमुळे उशीर झाल्याचेही त्यांनी सांगितले. ते साडेआठनंतर बैठकीस पोहोचले आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल तसेच सुनील तटकरे यांची भेट घेतली.
विलिनीकरणाबाबत काय सांगितलं?
खोसकर यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य विलिनीकरणाचा विषय हा ‘कुटुंबाचा विषय’ असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. “सध्याची परिस्थिती जशी आहे, तशीच पुढे जायचे,” असा संदेश आमदारांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आपण उशिरा पोहोचल्याने संपूर्ण भाषण ऐकता आले नाही, असेही त्यांनी नमूद केले.
सुनील तटकरे यांनीही हा निर्णय कुटुंबीयांचा असल्याचे सांगितले असून, जो निर्णय होईल तो मान्य करावा लागेल, असे मत व्यक्त केल्याचे खोसकरांनी सांगितले. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सर्व आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला.
नरहरी झिरवळ प्रकरणावर प्रतिक्रिया-
नरहरी झिरवळ यांच्यावरील आरोपांबाबत बोलताना खोसकर म्हणाले की, झिरवळ हे सामान्य लोकांमधून आलेले आदिवासी नेते असून त्यांच्यावर होत असलेले आरोप चुकीचे आहेत. घटना घडली त्या वेळी ते दिल्लीमध्ये होते, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून काही चुका झाल्यास त्यासाठी मंत्र्यांना जबाबदार धरणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. या विषयावर कोणीही राजकारण करू नये, असेही त्यांनी आवाहन केले.
अजित पवार विमान अपघाताबाबत विधान-
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात बोलताना खोसकर म्हणाले की, मुख्यमंत्री आणि अजित दादा यांचे विशेष संबंध होते. या प्रकरणाच्या तपासात मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदी कोणतीही कसर ठेवणार नाहीत, अशी आपली अपेक्षा आहे. जर घातपाताचा संशय असेल, तर न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाशिकमधील शेतकरी प्रश्नावर भूमिका-
नाशिकमधील बैठकीबद्दल बोलताना खोसकर म्हणाले की, त्र्यंबकेश्वर परिसरात जमिनीची किंमत २५ लाख रुपये प्रति गुंठा असताना काही ठिकाणी केवळ एक लाख रुपये प्रति गुंठा दराने जमीन घेण्याचा प्रयत्न होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांना त्रास देऊन कुंभमेळा आयोजित करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. अनेक शेतकरी भात शेतीवर अवलंबून असल्याने त्यांच्या हिताचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले असले, तरी तूर्तास तरी कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचे संकेत मिळत आहेत.