कुणाल कामरा शिंदे अवमान प्रकरणात विधानभवनात; ‘पुन्हा मुंबईत शो करणार’ स्पष्ट भूमिका

    17-Feb-2026
Total Views |

Kunal Kamra
 Image Source:(Internet)
मुंबई :
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंगात्मक गाण्याप्रकरणी आज विधानभवनात हक्कभंग समितीसमोर हजेरी लावली. मात्र काही कारणास्तव नियोजित सुनावणी पार पडली नाही. पुढील सुनावणी १० मार्च रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
२३ मार्च २०२५ रोजी आपल्या शोदरम्यान कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित व्यंगात्मक गाणे सादर केले होते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी खार येथील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये तोडफोड केली होती. त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी कामराविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता.
 
मी संविधान मानणारा व्यक्ती-
विधानभवनात माध्यमांशी बोलताना कुणाल कामराने सांगितले, “मी संविधान मानणारा व्यक्ती आहे. काही कारणामुळे आज सुनावणी झाली नाही. जेव्हा पुन्हा बोलावले जाईल तेव्हा मी नक्की हजर राहीन. १० मार्च ही पुढील तारीख देण्यात आली आहे, त्यावेळी मी येईन.”
 
शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेल्या तोडफोडीनंतर स्वतःला सुरक्षित वाटते का, असा प्रश्न विचारला असता कामरा म्हणाला, “मला कोणत्याही हल्ल्याची भीती नाही.”
 
“सत्ताधाऱ्यांना जे आवडेल ते मी का बोलू?”
जनतेला तुमचे मत पटते, पण सत्ताधाऱ्यांना का पटत नाही, या प्रश्नावर कामरा म्हणाला, “सत्ताधाऱ्यांना जे आवडेल ते मी का बोलू? त्यासाठी इतर लोक आहेत.” तसेच मुंबईत पुन्हा कॉमेडी शो आयोजित करणार का, यावर तो म्हणाला, “मी नक्कीच मुंबईत पुन्हा शो करणार आहे.”
 
नोटिशीला दिलेलं उत्तर-
यापूर्वी हक्कभंगाच्या नोटिशीला उत्तर देताना कामराने स्पष्ट केले होते की, कोणत्याही व्यक्तीवर व्यंगात्मक टीका करणे म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजात अडथळा निर्माण करणे नाही. “माझ्या गाण्यामुळे मी कोणत्याही प्रकारे विधिमंडळाच्या कामात हस्तक्षेप केलेला नाही. यात फक्त व्यंग आणि कलात्मक अभिव्यक्तीद्वारे मत मांडले आहे. जर माझ्या गाण्यामुळे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचा अवमान झाला असेल, तरी माझा हेतू सभागृहाचा अवमान करण्याचा नव्हता,” असे त्याने नमूद केले होते.
 
दरम्यान, या प्रकरणामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध सभागृहाचा सन्मान या मुद्द्यावर राज्यात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.