अभिनेता सलमान खानचे वडील लेखक सलीम खान यांची प्रकृती बिघडली; लीलावती रुग्णालयात दाखल

    17-Feb-2026
Total Views |
 
Salman Khan
 Image Source:(Internet)
मुंबई :
अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांचे वडील आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांना मुंबईतील लीलावती रुग्णालय येथे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 
त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नसला, तरी ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत असल्याचे समजते. ही बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
 
रुग्णालयाबाहेर सलमान खान दिसून आले असून कुटुंबातील इतर सदस्यही तेथे उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. सलीम खान यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
 
सलीम खान यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत ‘सलीम-जावेद’ या जोडीच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर चित्रपट दिले. शोले, दीवार आणि जंजीर यांसारख्या चित्रपटांच्या पटकथांमुळे त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला. हिंदी चित्रपटांमध्ये ‘अँग्री यंग मॅन’ची प्रतिमा घडवण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो.