माहिती उघड केली तर विधानसभाध्यक्षांना पद सोडावे लागेल; संजय राऊतांचा इशारा

    16-Feb-2026
Total Views |
 
Narvekar case
 Image Source:(Internet)
अलिबाग :
अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी येथे जमिनीच्या वादातून मारहाण झाल्याचा दावा समोर आला असून, त्याचा एक चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या चित्रफितीत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Narvekar) दिसत असल्याचे सांगितले जात असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
 
या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया देत विधानसभाध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. “आमच्याकडे असलेली अधिक माहिती समोर आणली तर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.
 
राऊत म्हणाले की, संबंधित चित्रफीत पाहिल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. “मी अलिबागचा असल्यामुळे येथील घडामोडींची मला पूर्ण माहिती आहे. मला बोलायला भाग पाडू नका. योग्य वेळी सर्व बाबी उघड केल्या जातील,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्षय शाह यांचे नाव घेत अलिबाग परिसरातील जमीन खरेदी व्यवहारांबाबत शंका उपस्थित केली.
 
दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ते त्यांच्या शेतजमिनीकडे जात असताना दोन शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू असल्याचे दिसले. त्यांनी केवळ त्यांना शांततेने वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि तेथून निघून गेले. संबंधित घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी नमूद केले.
 
या चित्रफितीमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, अलिबागमधील जमीन व्यवहार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.