Image Source:(Internet)
मुंबई :
प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर १ फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हरियाणा येथून मुख्य शूटरसह तीन जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण ९ आरोपींना अटक झाली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या विशेष कार्यदलाच्या मदतीने केली.
हरियाणातून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ऋतिक यादव (आग्रा), दीपक (नोएडा), सनी आणि सोनू (दोघेही आग्रा) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, यापैकी एक जण मुख्य शूटर असून इतर त्याचे सहकारी आहेत.
याआधी पोलिसांनी पुणे आणि परिसरातून पाच आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये आदित्य गायकी, सिद्धार्थ येनपुरे, समर्थ पोमाजी, स्वप्नील सकट आणि आसाराम फसाळे उर्फ बाबू (शस्त्र पुरवठादार) यांचा समावेश आहे. या सर्वांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या संपूर्ण कटाचा सूत्रधार शुभम लोणकर असल्याचे तपासात समोर आले आहे. तो सध्या फरार असून त्याचा संबंध कुख्यात गुंड Lawrence Bishnoi यांच्या टोळीशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
स्कूटरमुळे उकल झाली-
या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा धागा एका स्कूटरमुळे सापडला. शेट्टी टॉवरपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर विले पार्ले पश्चिमेकडील एका हॉटेलजवळ एक स्कूटर बेवारस अवस्थेत आढळली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास करून बोटांचे ठसे, डीएनए नमुने आणि इतर पुरावे गोळा केले.
तपासात समोर आले की ही सेकंड-हँड होंडा डिओ स्कूटर पुण्यातील कर्वेनगर येथील अमन मारोटे यांच्याकडून खरेदी करण्यात आली होती. १९ वर्षीय आदित्य गायकी याने जानेवारी महिन्यात सुमारे ३० हजार रुपयांना ही स्कूटर घेतली होती. ही खरेदी शुभम लोणकरच्या सांगण्यावरून स्वप्नील सकटने पैसे पुरवून केल्याचे उघड झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आरोपींच्या नेटवर्कचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.