सौदीतील शाही लग्नात पाहुण्यांना ‘सोन्याची बिस्किटे’? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर

    16-Feb-2026
Total Views |
 
Gold biscuits
 Image Source:(Internet)
रियाध :
सोशल मीडियावर दररोज विविध दावे आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या Saudi Arabia मधील एका कथित शाही लग्नाचा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडिओत पाहुण्यांना परत भेट म्हणून २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे विस्फारले; मात्र या दाव्यामागचे वास्तव वेगळेच असल्याचे समोर आले आहे.
 
काय दिसतं व्हिडिओमध्ये?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भव्य लग्नसोहळा दिसतो. पारंपरिक अरबी पोशाखातील पाहुण्यांसमोर एक व्यक्ती सजवलेली पेटी उघडते. पेटीत सोन्यासारखी चमकणारी बिस्किटे ठेवलेली दिसतात. सोशल मीडियावर दावा करण्यात आला की, मुलीकडून मुलाकडच्या पाहुण्यांना सोन्याची बिस्किटे भेट म्हणून देण्यात आली.
 
 
 
हा व्हिडिओ X या सामाजिक माध्यमावर Rainmaker1973 या खात्यावरून शेअर करण्यात आला असून, त्याला हजारो पसंती आणि प्रेक्षणसंख्या मिळाली आहे.
 
काय आहे नेमकं सत्य?
या व्हिडिओवरील चर्चेदरम्यान Grok या कृत्रिम बुद्धिमत्ता साधनाने स्पष्टीकरण दिले की, पाहुण्यांना २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे नव्हे, तर लक्झरी चॉकलेट देण्यात आले होते. हे प्रसिद्ध Patchi या ब्रँडचे महागडे चॉकलेट असून ते सोन्याच्या बिस्किटासारख्या दिसणाऱ्या आकर्षक कागदात गुंडाळलेले असते.
 
मध्यपूर्वेतील काही राजघराणे किंवा उच्चभ्रू कुटुंबांमध्ये पाहुण्यांचे स्वागत अशा लक्झरी चॉकलेटद्वारे करण्याची परंपरा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
 
‘सोन्यासारखं’ दिसलं, पण सोन...
या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, सोशल मीडियावरील प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. व्हिडिओतील वस्तू सोन्यासारखी दिसत असली, तरी ती प्रत्यक्षात चॉकलेट होती.
 
सोशल मीडियावरील व्हायरल दावे पडताळणीशिवाय स्वीकारू नयेत, याचीच ही घटना जणू आठवण करून देते.